। ब्रिजटाऊन । वृत्तसंस्था ।
ख्रिस जॉर्डनने हॅट्ट्रिकसह टिपलेले चार फलंदाज आणि कर्णधार जॉस बटलरच्या घणाघाती नाबाद 90 धावांच्या खेळीच्या जोरावर गतविजेत्या इंग्लंड संघाने रविवारी अमेरिका संघावर 10 गडी व 62 चेंडू राखून मोठा विजय मिळवला आणि टी-20 विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा इंग्लंड पहिला संघ ठरला आहे. या विजयामुळे आता दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीज यांच्यामधील लढतीच्या निकालानंतर गट दोनमध्ये उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा देश ठरणार आहे. यावेळी अमेरिका संघाकडून इंग्लंडसमोर 116 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी इंग्लंडला हे आव्हान 18.4 षटकांत पूर्ण करायचे होते. जॉस बटलर व फिल सॉल्ट या सलामी जोडीने अमेरिकन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दोघांनी नाबाद 117 धावांची आक्रमक भागीदारी केली. अवघ्या 9.4 षटकांत हे आव्हान ओलांडण्यात आले. बटलरने 38 चेंडूंमध्ये सहा चौकार व सात षटकारांच्या आतषबाजीने नाबाद 83 धावांची खेळी साकारली. सॉल्टने नाबाद 25 धावा करीत त्याला उत्तम साथ दिली.