महिला हॉकी संघाचा पराक्रम!

प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक
हॅट्ट्रिक गर्ल वंदना विजयाची शिल्पकार

| टोक्यो | वृत्तसंस्था |
ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय महिला हॉकी संघाने 41 वर्षांनंतर प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम केला. शनिवारी महिलांनी अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 4-3 असा पराभव करून बाद फेरीच्या आशा उंचावल्या. हॅट्ट्रिक साकारणारी वंदना कटारिया भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली.

‘अ’ गटातील सकाळी झालेल्या या लढतीत भारताने विजय मिळवल्यानंतरही आर्यलड विरुद्ध ब्रिटन यांच्यात सायंकाळी रंगलेल्या सामन्यावर सर्वाचे लक्ष होते. ब्रिटनने आर्यलडला 2-0 असे नमवल्याने भारताच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. भारताने पाच सामन्यांतील दोन विजयांच्या सहा गुणांसह चौथे स्थान मिळवले. आता सोमवारी भारताला ऑस्ट्रेलियाशी दोन हात करावे लागणार आहेत.
आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी वंदना (4, 17, 49वे मिनिट) आणि नेहा गोयल (32 मि.) यांनी गोल नोंदवले. चौथ्या सत्रात 49व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर वंदनाने सुरेख गोल नोंदवून भारताचा विजय सुनिश्‍चित केला. याबरोबरच वंदना भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये हॅट्ट्रिक साकारणारी पहिलीच महिला हॉकीपटू ठरली.

Exit mobile version