टेलर फ्रिटझ्वर चार सेटमध्ये विजय
| मेलबर्न | वृत्तसंस्था |
सर्वाधिक 24 वेळा ग्रँडस्लॅम जिंकणार्या नोवाक जोकोविच याने मंगळवारी ऑस्ट्रेलियन ओपन या टेनिस ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली. अव्वल मानांकित जोकोविच याने पुरुषांच्या एकेरी लढतीमध्ये अमेरिकेच्या टेलर फ्रिटझ् याच्यावर चार सेटमध्ये (7-6, 4-6, 6-2, 6-3) विजय मिळवत या स्पर्धेत 11व्यांदा अंतिम चारमध्ये प्रवेश केला. ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची जोकोविचची ही 48वी खेप ठरली, हे विशेष.
गतविजेता नोवाक जोकोविच – टेलर फ्रिटझ् यांच्यामधील लढतीची सुरुवात रोमहर्षक झाली. पहिल्या सेटमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंमध्ये 6-6 अशी बरोबरी झाली. त्यामुळे टायब्रेकमध्ये या सेटचा निकाल लागला. टेलर याने आठ ब्रेक पॉईंट वाचवत जोकोविचला कडवी झुंज दिली. जोकोविच याने दबावाखाली खेळ उंचावला आणि तब्बल 84 मिनिटांनंतर 7-6 असा पहिला सेट जिंकला.
टेलर फ्रिटझ् याने दुसर्या सेटच्या सुरुवातीलाच नोवाक जोकोविच याची सर्व्हिस मोडून काढली. त्यानंतर त्याने मागे वळून बघितले नाही. त्याने हा सेट 6-4 असा जिंकत बरोबरी साधली. जोकोविच याने तिसर्या सेटमध्ये संयमी खेळ केला आणि टेलरवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. सर्बियाच्या या पठ्ठ्याने 6-2 असे यश मिळवले. चौथ्या सेटमध्ये टेलर याच्या हालचाली मंदावल्या. जोकोविचने सहाव्या गेममध्ये टेलर याची सर्व्हिस मोडली व सामना आपल्या नावावर केला. जोकोविच याने याआधी टेलरविरुद्ध आठ लढतींमध्ये विजय मिळवले होते. त्याची ही विजयी परंपरा यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कायम राहिली.
महिला एकेरी विभागात मानांकित टेनिसपटूंनी अंतिम चारमध्ये प्रवेश केला. गतविजेती व दुसरी मानांकित अरीना सबलेंका हिने बार्बोरा क्रेझीकोव्हा हिच्यावर 6-2, 6-3 असा सहज विजय मिळवला. बेलारुसच्या सबालेंका हिने सलग सहाव्यांदा ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली हे विशेष. अमेरिकेच्या कोको गॉफ हिने मार्टा कोस्तयुक हिचा कडवा संघर्ष 7-6, 6-7, 6-2 असा तीन तास व आठ मिनिटांमध्ये मोडून काढला.
टेलर फ्रिटझ् याच्याविरुद्ध लढतीत ब्रेकपॉईंटचे गुणांमध्ये रूपांतर करणे अत्यंत खराब होते; पण जेव्हा नितांत गरज होती, तेव्हा अर्थातच तिसर्या व चौथ्या सेटमध्ये त्याची सर्व्हिस मोडता आली. याचे समाधान आहे. तिसर्या सेटपासून माझ्या खेळात कमालीची सुधारणा झाली. त्याच्यापेक्षा मी जास्त एसेस मारल्याचे समजले. फ्रिटझ् याने आक्रमक खेळ केला. त्यामुळे ही आकडेवारी पाहून आश्चर्य वाटले.
नोवाक जोकोविच, टेनिसपटू, सर्बिया







