खोपटा पुलाच्या दुरुस्तीला विलंब

अवजड कंटेनर वाहतूक बंद करण्याचा इशारा

| रसायनी | प्रतिनिधी |

खोपटा पुलाच्या दुरुस्ती कामाला होत असलेली दिरंगाई आणि परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले. दोन वेळा मुदत देऊनही पुलाचे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी मार्ग खुला करावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने दिवाळीपूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीला माजी आमदार मनोहर भोईर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उरण पंचायत समिती सदस्या कविता पाटील, सत्यवान भगत, राकेश भोईर, रूपेश पाटील, भूषण ठाकूर, रोहिदास पाटील, प्रांजल पाटील, समाधान ठाकूर, अतुल ठाकूर, नंदकुमार म्हात्रे, मयूर डाकी, वशेनीचे उपसरपंच गणेश म्हात्रे, प्रशांत म्हात्रे यांच्यासह शिवसेना व मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, उपकार्यकारी अभियंता डी. एम. पाटील आणि पुलाच्या दुरुस्तीचे काम करणारे ठेकेदार मिहिर आजगावकर यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली. खोपटा पुलाच्या दुरुस्तीला होत असलेल्या विलंबामुळे उरणच्या पूर्व विभागातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. पुलाची दुरवस्था आणि रस्त्यांची खराब स्थिती यामुळे नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, दैनंदिन प्रवासात मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. यापूर्वीही उबाठा शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागासोबत बैठक घेऊन पुलाच्या कामाचा आढावा घेतला होता.

प्रत्यक्ष पुलाची पाहणी करून काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली होती. मात्र, बांधकाम विभागाकडून दोन वेळा अंतिम मुदत देण्यात येऊनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत असून, पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी मनोहर भोईर म्हणाले की, पुलाच्या दुरुस्ती कामात होणाऱ्या विलंबाची कारणे समजून घेऊन शिवसेनेने या प्रश्नाचे राजकारण केले नाही. पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेतली. मात्र, वारंवार मुदत देऊनही काम पूर्ण होत नसल्याने जनतेची गैरसोय होत आहे. त्यामुळे आज पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागला.

पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी
खोपटा पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला झाला पाहिजे. अन्यथा जनतेच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून या मार्गावरील अवजड कंटेनर वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागेल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल, असा इशारा मनोहर भोईर यांनी दिला. यावेळी संतोष ठाकूर, कविता पाटील,भूषण ठाकूर आणि सत्यवान भगत यांनीही नाराजी व्यक्त केली.
Exit mobile version