निर्णय घेण्यास उशीर केला- शरद पवार

डब्ल्यूएफआयच्या निलंबनानंतर प्रतिक्रिया

| पुणे | प्रतिनिधी |

भारतीय कुस्ती परिषदेच्या निवडून आलेल्या सर्व पदाधिकार्‍यांना क्रीडा मंत्रालयाने निलंबित केलं आहे. यानंतर क्रीडा जगात यावरून समिश्र प्रतिक्रिया आल्या. दरम्यान, अनेक वर्षे महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवारांनी क्रीडा मंत्रालयाने हा निर्णय घेण्यास उशीर केला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शरद पवार हे पुण्यातील भीमथडीचे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी राजकारणाबरोबरच भारतीय कुस्ती परिषदेच्या संदर्भात घडलेल्या घडामोडींवरदेखील शरद पवार यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘क्रीडा मंत्रालायने भारतीय कुस्ती परिषदेची नवी बॉडी निलंबित करण्यास उशीर केला. त्यांनी यापूर्वीच हे करायला हवे होते. ज्या महिला खेळाडूंनी भारताचा सन्मान वाढवला, त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. देशाकडून खेळताना कर्तृत्व गाजवणार्‍या महिला खेळाडूंसोबतची वागणूक योग्य नव्हती. यापूर्वीच भारतीय कुस्ती परिषदेच्या सदस्यांना निलंबित करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता.’

ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्ती असलेल्या संजय सिंह यांची भारतीय कुस्ती परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर नव्या मंडळाने 15 आणि 20 वर्षांखालील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची घाई गडबडीत घोषणा केली. यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नवीन मंडळाने घाई गडबडीत निर्णय घेतल्याचे कारण देत अध्यक्षांसह संपूर्ण मंडळच निलंबित केलं. मात्र, या मागचं खरं कारण हे ब्रिजभूषण यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर साक्षी मलिकने कुस्ती सोडली, तर बजरंगने पद्मश्री पीएमओच्या बाहेरील पदपथावर ठेवला होता. त्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version