| पेण | प्रतिनिधी |
रविशेठ पाटील एज्युकेशन सोसायचीच्या ट्री हाऊस हायस्कूलला दिल्ली बोर्डाची मान्यता मिळाली आहे. शाळा पहिली ते दहावीपर्यंत असून दिल्ली बोर्डाने सी.बी.एस.ई. संलग्नता देऊन दिल्ली बोर्डाकडून मान्यता मिळाली आहे.
हे ट्री हाऊस स्कूल 2016 साली सुरू झाले. महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन ट्री हाऊस शाळा सुरू करण्यात आली होती. आता दिल्ली बोर्डाकडून मान्यता देण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे पेण शहरामध्ये सी.बी.एस.ई बोर्डाची मान्यता प्राप्त मिळाल्याने भविष्यात याचा फायदा पेण तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठयाप्रमाणात होणार आहे. त्यातच या शाळेची ईमारत ही निसर्गरम्य ठिकाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना गर्दीचा अथवा गोंधळाचा त्रास होत नसल्याने कळत नकळत विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत होत आहे.
यावेळी कृषीवलच्या प्रतिनिधीशी बोलताना रविशेठ पाटील एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा शर्मिला पाटील यांनी सांगितले की, पेण हे विद्येचे खरे माहेरघर आहे. म्हणूनच लोकमान्य टिळकांनी पेणला कोकणातील पुणे संबोधले होते. भविष्यात पेण तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने आणि स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याच्या दृष्टीने ट्री हाउस हायस्कूलला दिल्ली बोर्डाची मान्यता आणली असून, या शैक्षणिक वर्षापासून नियमित सी.बी.एस.ई.च्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण पध्दती अवलंबली जाईल. आणि याचा फायदा नक्कीच पेण येथील विद्यार्थ्यांना होईल अशी माझी खात्री आहे.