। पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल सेक्टर- 18 मधील 13 लाखांच्या घरफोडीप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी दिल्ली येथून तिघांना अटक केली. अलीमुद्दीन अब्दुल हमीद (47), साजीद खुबनसीब (27) व मोहम्मद रमजान मोहम्मद हनीफ (44) अशी पकडलेल्या आरोपांची नावे असून पोलिसांनी गुह्यातील 9 लाखांचा किमती मुद्देमाल व तीन मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.
नवीन पनवेल सेक्टर-18 मधील अष्टविनायक ओनर्स या इमारतीत राहणारे मंगेश पुरुषन (63) यांच्या घरातून 27 जुलै रोजी 13 लाखांचे दागिने चोरण्यात आले होते. या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या वेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे पनवेल रेल्वे स्थानकातून लोकल ट्रेनने मुंबईतील डोंगरी भागात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या तांत्रिक तपासात तिघेही दिल्ली येथे राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर चासकर यांच्या पथकाने दिल्ली येथून तिन्हीही आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 9 लाखांचे 20 तोळे वजनाचे दागिने हस्तगत केले आहेत.
पनवेलमधील घरफोडीचे दिल्लीत कनेक्शन; तिघांना अटक
