| गुवाहाटी | वृत्तसंस्था |
आयपीएल 2023 च्या 11 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वार्नरने एका नवीन विक्रमाला गवसणी घातली. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगतदार सामना झाला. या सामन्यात दिल्लीचा 57 धावांनी दारुण पराभव झाला. पण कर्णधार डेविड वार्नरने आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान 6000 धावा करण्याचा विक्रम केला आहे.
वॉर्नरने धावांचा हा विक्रम फक्त 165 इनिंगमध्ये पूर्ण केला आहे. याआधी हा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने 188 इनिंगमध्ये हा खास पराक्रम केला होता. आयपीएलच्या इतिहासात 6000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा बनवण्याच्या लिस्टमध्ये वार्नर, विराट कोहली आणि शिखर धवननंतर तिसरा खेळाडू बनला आहे. धवनला इतक्या धावा पूर्ण करण्यासाठी 199 सामने खेळावे लागले होते.
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करून दिल्ली कॅपिटल्ससमोर 200 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 9 विकेट्स गमावून 142 धावा केल्या. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा या सामन्यात 57 धावांनी पराभव झाला. राजस्थानसाठी जोस बटलर आणि जैस्वालने धडाकेबाज फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 51 चेंडूत 98 धावांची भागिदारी रचली. जैस्वालने 31 चेंडूत 60 धावा केल्या. तर बटलरने 51 चेंडूत 79 धावा कुटल्या. दिल्लीकडून कर्णधार डेविड वार्नरने सर्वाधिक 65 धावांची खेळी साकारली. परंतु, वार्नरला दिल्ली कॅपिटल्सला विजयाच्या दिशेनं नेता आलं नाही.