नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्लीत फेब्रुवारी 2020 मध्ये झालेली दंगल पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आली होती, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या दंगलीत मोठी जीवित आणि आर्थिक हानी झाली होती. फिर्यादीने कोर्टात सादर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये आंदोलकांचे आचरण स्पष्टपणे दर्शविते की, ही एक सुनियोजित दंगज होती, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
2020च्या फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) समर्थन देणारे आणि विरोध करणारे गट यांच्यात हिंसाचार झाला होता. यामध्ये कमीत कमी 53 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर शेकडो अन्य जखमी झाले होते. दरम्यान, दिल्ली दंगलीतील एका आरोपीला जामीन नाकारताना, न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद म्हणाले, सीसीटीव्ही कॅमेर्यांची पद्धतशीर तोडफोड शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या पूर्वनियोजित कटाची पुष्टी करते. शेकडो दंगलखोरांनी निर्दयीपणे लाठी आणि बॅटने पोलीस पथकावर हल्ला केला, हेदेखील स्पष्ट आहे. त्यामुळे ही दंगल अचानक घडली नसून, हा एक मोठा कट होता, असे न्यायालयाने म्हटले आहे.
या दंगलीत विरोध प्रदर्शन करतान आरोपी मोहम्मद इब्राहिम हातात तलवार घेऊन होता. त्याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता, की रतनलालचा मृत्यू त्याच्या जखमांबाबतच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे तलवारीने झाला नाही. आणि आरोपीने फक्त स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षा करण्यासाठी तलवार उचलली होती. दरम्यान, यावर उत्तर देत कोर्टाने म्हटलं की, आरोपीच्या हातातील शस्त्र हे न्यायालयाला आरोपीच्या तुरुंगवासाची मुदत वाढवण्याचा निर्णायक पुरावा आहे. त्याने वापरलेल्या शस्त्रामुळे गंभीर दुखापत किंवा मृत्यू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ शकत नाही.