| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एक मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एक कार उभी होती, त्या कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. या स्फोटात काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, त्यामागचं कारण काय याचा तपास केला जात आहे. सोमवारी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी हा स्फोट झाल्याची माहिती आहे. त्यानंतर लगेचच फायर ब्रिगेड या ठिकाणी पोहोचलं आणि त्यांनी मदत कार्य सुरू केलं.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे. स्फोट झाल्यानंतर लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. लोकांनी घटनास्थळी जात गर्दी केली. ही गाडी लाल किल्ला परिसरातील मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर उभी होती. स्फोट झाल्यानंतर काही काळासाठी येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना समोर आल्यानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. कारमधील स्फोटानंतर आग लागली. हीच आग विझविण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून केला जात आहे. दुसरीकडे बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. कारमध्ये स्फोट नेमका का झाला? यामागे काही घातपाताचा उद्देश तर नव्हता ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता शोधली जाणार आहेत.





