शिंदे सरकारकडून जाणीवपूर्वक त्रास: आ.राजन साळवी यांचा आरोप


अलिबागमध्ये एसीबीतर्फे चौकशी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

आपण ठाकरे गटात असल्यामुळे शिंदे सरकार आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप शिवसेना (ठाकरे) आ.राजन साळवी यांनी अलिबाग येथे केला आहे. अलिबाग येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सरकारच्या दडपशाहीला आपण भीक घालत नाही. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यांनी आम्हाला लढायला शिकवले आहे. माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला नोटीस पाठवून त्रास देत आहेत. माझे मतदार, जनता यांना राजन साळवी काय आहे हे माहीत आहे. माझ्या मालमत्ते बाबत असलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी मी लाच लुचपत कार्यालयात आलो आहे, अशी प्रतिक्रिया साळवी यांनी दिली आहे.

राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना मालमत्तेच्या चौकशी बाबत रायगड लाच लुचपत विभागाने नोटीस पाठवली होती. त्यानुसार 14 डिसेंबर रोजी साळवी हे अलिबाग लाच लुचपत कार्यालयात हजर झाले होते. त्यावेळी साडे चार तास चौकशी अधिकार्‍यांनी केली होती. त्यानंतर त्यांना त्याच्या आणि कुटुंबाच्या मालमत्तेची कागदपत्रे सादर करण्यास विभागाने सांगितले होते.

20 जानेवारी रोजी कागदपत्रे सादर करणार असल्याचे साळवी यांनी त्यावेळी सागितले होते. त्यानुसार ते शुक्रवारी दुपारी बारा अलिबाग येथील लाच लुचपत कार्यालयात कागदपत्रे घेऊन हजर झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यासह शिवसैनिक त्यांच्या सोबत हजर होते. पिंपळभाट येथे आ राजन साळवी यांचे आगमन होताच शेकापच्यावतीने त्यांचे वेश्‍वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील आणि चेंढरेचे माजी उपसरपंच दत्ता ढवळे यांनी त्यांचे स्वागत केले.

Exit mobile version