| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या नियमाप्रमाणे गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जात असून अद्यापही तालुक्यात सिलिंडरचा तुटवडा भासत नाही. मात्र, सिलिंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ झाली असून 864 रुपयांना मिळणारा सिलेंडर मार्चच्या सुरुवातीपासून 924 रुपयांना मिळत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे उज्ज्वला सिंगल व डबल गॅस धारकांना 45 दिवसांनंतर तर सिंगल घरगुती गॅस धारकांना 25 दिवसानंतर, तसेच डबल घरगुती गॅस धारकांना 35 दिवसानंतर सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे. याबाबत गॅस वितरक योगेश देशमुख यांनी सांगितले की, तालुक्यात अद्यापही सिलिंडरचा तुटवडा नसून नागरिकांना नियमित सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. परंतु, सिलिंडर बुक केल्यानंतर तो ग्राहकाला देताना जो ओटीपी घ्यावा लागतो, त्याला बऱ्याचशा अडचणी येतात. येथील ग्राहक हे ग्रामीण भागातील असल्याने सर्वांनाच ओटीपी सांगता येत नाही. तसेच, बऱ्याचदा नेटवर्कच्या प्रॉब्लेममुले ओटीपी मिळण्यास अडचण निर्माण होते. शासनाने ओटीपी अनिवार्य केल्याने ग्राहकांकडून ओटीपी घेऊन त्यांना सिलेंडर देणे त्रासदायक ठरत आहे.






