। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात भीषण अपघात झाला आहे. कारने एका डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात डिलीव्हरी बॉयचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
गुरुवारी (दि. 10) मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील सुप्रसिद्ध कोरेगाव पार्क परिसरात हा भीषण अपघात झाला. घटनेतील कारचालक प्रदीप तयाल हा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळाली आहे. कारचालकाने प्रथम एका ॲक्टिव्हाला धडक दिली. त्यात तीन जण किरकोळ जखमी झाले. त्यानंतर तो तिथेही न थांबता तसाच वेगाने पुढे गेला आणि एका दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील डिलिव्हरी बॉय रौफ अकबर शेख (21) हा गंभीर जखमी झाला. मात्र, कारचालकाने तिथूनही पळ काढला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी बाईकस्वाराला तात्काळ रुग्णालायत नेले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.







