वाडा-भिवंडी रस्त्यातच प्रसुती

। पालघर । प्रतिनिधी ।

भिवंडी येथील गरोदर महिला वाडा तालुक्यात प्रसूती दरम्यान थांबली होती. मात्र, त्रास जाणवत असल्याने तिच्या नातेवाईकांनी वाडा ग्रामीण रुग्णालयात तपासासाठी नेली असता तेथील रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी आणि अधिकार्‍यांनी इतर ठिकाणी जाण्यास सांगितले होते. यामुळे तिला इतर ठिकाणी नेत असताना रस्त्यातच या महिलेची प्रसुती झाली. यामुळे पुन्हा त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या महिला व नवजात मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. परंतु, वाडा ग्रामीण रुग्णालयांमधून रुग्णाला अनेकदा उपचारासाठी दुसरीकडे जाण्यास सांगण्यात येते. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच वाडा-भिवंडी महामार्गाची दयनीय अवस्था असल्याने नाईलाजास्तव इतर ठिकाणी उपचारासाठी जाताना रुग्णाचे मोठे हाल होत असतात.

Exit mobile version