मुस्लिम समाजाच्यावतीने शासनाला निवेदन
| कर्जत | वार्ताहर |
कर्जत मुस्लिम दफनभूमीमध्ये बेवारस मृतदेह पुरणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी कर्जत मुस्लिम समाजाच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे. कर्जत मुस्लिम समाजाचे अकील मुजावर, युसुफ खान, चांद पापा मिया मुजावर, नदीम खान, लियाकत खान, रशीद मुल्ला, हरून अत्तर, असलम खान आदींनी उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत तहसीलदार कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी कर्जत पोलीस ठाणे येथे भेट देऊन त्यांना निवेदन सादर केले.
सदर निवेदनात मुस्लिम समाजाची दफनभूमी कर्जत रेल्वे लाईनच्या जवळ आणि उल्हास नदीच्या काठावर आहे. कर्जत दफनभूमी येथे असलेल्या हजरत युसुफ शा बाबा यांची दर्गा आहे. आपल्या कर्जतच्या प्रत्येक सामाज्याचा व्यक्ती या दर्ग्यावर दर्शनासाठी जातो. आपल्या कर्जतकराचे श्रद्धास्थान आहे. गेली 2 ते 3 वर्षापासून कर्जत मुस्लिम दफनभूमी येथे बेवारस मृतदेह पुरण्याचे काम सुरु आहे. मुस्लिम समाजाच्या व्यतिरिक्त कुठल्याही समाजाला या दफनभूमीमध्ये पुरण्याचा हक्क नाही आणि असे झाले तर मुस्लिम समाज याला विरोध करत आहे.
कोरोनानंतरच्या पुरलेल्या मृतदेहांची माहिती आमच्याकडे नाही. अशा काही मृतदेह पुरण्यात आलेली आहेत. त्याची आपल्या विभागामार्फत चौकशी व्हावी आणि असे चुकीचे काम करणार्या दोषी व्यक्तीला किंवा यामध्ये असले काम करुन घेणार्याला, काम करणार्याला, सामील होणार्याला, मुस्लिम समाजाच्या भावनांशी खेळणार्या, आपापसात तेढ निर्माण करणार्या दोषीला शिक्षा व्हावी अशी मागणी कर्जत मुस्लिम समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.






