भुजबळांना शिवीगाळ करणाऱ्यावर कारवाईची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ पक्षाचे अधिवेशनसाठी कर्जत येथे येत असताना त्यांना एका तरुणाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. त्या तरुणाचा ओबीसी समाज संघटनांनी निषेध केला असून, संबंधित तरुणावर पोलिसांनी कारवाई करावी आणि समाजात तेढ निर्माण करणारी कृत्य करू नयेत, अशी मागणी करणारे निवेदन ओबीसी समाज संघटनेने कर्जत पोलिसांना दिले आहे. दरम्यान, संबंधित तरुणावर कर्जत पोलिसांनी कारवाई केली नाही तर जिल्हाभर आंदोलन उभे करू, त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ती पोलिसांची जबाबदारी असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

राज्यात मराठा आरक्षणाने वातावरण तापले असताना कर्जत तालुक्यात दि.30 नोव्हेंबर रोजी छगन भुजबळ पक्षाच्या अधिवेशनासाठी कर्जतला आले होते. त्यावेळी छगन भुजबळ यांच्या स्वागतासाठी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते कर्जत शहरातील यशदा मंगल कार्यालय येथे जमले होते. त्यावेळी दहीवली भागातील मनोज लाड या तरुणाने छगन भुजबळ यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर कर्जत तालुक्यातील वातावरण तापले आणि कर्जत शहरात मध्यरात्री दोन वाजेपर्यंत मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर कर्जत तालुक्यात मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असा संघर्ष निर्माण होताना दिसत आहे. मंत्री छगन भुजबळांना शिवीगाळ करणाऱ्या तरुणाचा एका वकिलाने सत्कार केला. त्यामुळे तालुक्यात दोन्ही समाजात अधिक तेढ निर्माण होत असून, ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

तालुक्यातील सर्व ओबीसी समाजांनी नेरळ येथे बैठक घेऊन मंत्री भुजबळांना शिवीगाळ करणाऱ्या तरुणाचा निषेध करून संबंधित तरुणावर पोलिसी कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती. तसेच निवेदन कर्जत पोलीस ठाण्यात दिले. त्यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश टोकरे, भटक्या विमुक्त जाती राष्ट्रीय उपाध्यक्ष भगवान चव्हाण, सोनार समाजाचे पोतदार यांच्यासह इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे तसेच नरेश जोशी, सुरेश गोमारे, अरुण कराळे, दशरथ मुने यांच्यासह अनेक समाज संघटना यांचे प्रतिनिधी हजर होते. दरम्यान, पोलिसांकडून कारवाई झाली नाही तर जिल्ह्यातील ओबीसी संघटना आंदोलन करतील, असा इशारा दिला.

Exit mobile version