भाजी विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या स्मारकाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. मात्र, याच स्मारकाच्या पायर्‍यांना व चौकातील रस्त्यालगत खेटून बसणार्‍या भाजी विक्रेत्यांमुळे चौकात अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे भविष्यात याठिकाणी अपघात होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे चौकातील भाजी विक्रेत्यांना चौकातून उठविण्याची कारवाई करून त्यांना ग्रामपंचायतीच्या प्रशस्त भाजी बाजारात बसविण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागोठणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आली.

नागोठणे ग्रामपंचायतीच्या स्व. बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या ग्रामसभेला ग्रामपंचायतीतील सत्ताधार्‍यांचे मार्गदर्शक शिवसेना नेते किशोर जैन, सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच अकलाख पानसरे, सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, ज्ञानेश्‍वर साळुंखे, सचिन ठोंबरे, संतोष नागोठणेकर, सुप्रिया काकडे, शबाना मुल्ला, अमृता महाडिक, भाविका गिजे, विनिता पाटील, ज्योती राऊत, पूनम काळे, शहनाज अधिकारी, जन्नत कुरेशी, सुल्ताना लंबाते, ग्रामसेवक राकेश टेमघरे, माजी उपसरपंच सुरेश जैन, सुनील लाड, मोहन नागोठणेकर, अशपाक पानसरे, सगीर अधिकारी आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

छ. शिवाजी महाराज चौकात लागणार्‍या दुचाकी, भाजीविक्रेते, दुकानदारांनी वाढविलेले शेड यामुळे चौक परिसर विद्रुप झाला आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यांना येथून उठविण्याबरोबरच चौकात नो पार्किंगचे फलक लावणे, बाजारपेठ, नुक्कड गल्लीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दुचाकी, हातगाड्यांवर कारवाई करणे, नागोठण्यासाठी खेळाचे मैदान असलेले सतीचा माळ विकसित करणे, उर्दू हायस्कूलसमोर येणार्‍या सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, शृंगार तलावाच्या दशक्रिया शेडचे काम करणे, मराठा आळीतील होळीचा माळाचे अतिक्रमण दूर करणे अशा अनेक सूचना यावेळी करण्यात आल्या. तर या सभेच्या सुरुवातीलाच ग्रामसेवक राकेश टेमघरे यांनी शासनाच्या विविध परिपत्रकांचे वाचन केले. यावेळी नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत जमा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Exit mobile version