| उरण | प्रतिनिधी |
समुद्रातून मासेमारी करून परतणाऱ्या बोटींना केळवणे व वशेणी येथील खाडीकिनाऱ्यावर जेट्टीची सुविधा उपलब्ध नसल्याने मासेमारी करणाऱ्या ग्रामीण भागातील बांधवांना अनेक समस्यांचा सामना करत आप आपल्या बोटी कुठे ना कुठे नांगरुन ठेवण्याची वेळ येत आहे. तरी उरण तालुक्यातील वशेणी व पनवेल तालुक्यातील केळवणे ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्यावर मासेमारीसाठी जेट्टी बांधून मिळावी अशी मागणी अखिल भारतीय मच्छीमार खलाशी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे यांनी शासनाकडे केली आहे. म्हात्रे यांनी माहिती देताना सांगितले की, उरण, पनवेल, पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील बांधवांचा उदर्निवाहाचा प्रमुख साधन भात शेती बरोबर मासेमारी हा व्यवसाय आहे. त्यामुळे वर्षातील नऊ महिने समुद्रात जाऊन मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. मात्र, पनवेल तालुक्यातील कळवणे, साई, दिघाटी, उरण तालुक्यातील वशेणी, आवरे, कडापे, गोवठणे, कोप्रोली, दिघोडे, खोपटा, पिरकोन आणि पेण तालुक्यातील दादर, वरेडी, सोनखार, भाल, कोपर, डोलघर आदी ग्रामीण भागातील मासेमारी करणाऱ्या बांधवांना खाडीकिनाऱ्यावर जेट्टीची सुविधा उपलब्ध नसल्याने बोटी नांगरुन ठेवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना हा करावा लागत आहे. तरी उरण तालुक्यातील वशेणी व पनवेल तालुक्यातील केळवणे ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्यावर मासेमारीसाठी जेट्टी बांधून मिळावी यासाठी शासनाकडे वारंवार मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
वशेणी केळवणे खाडीकिनारी जेट्टीची मागणी
