सिडकोच्या पाणीपुरवठ्यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका आणि सिडको क्षेत्रातील सध्याच्या तसेच भविष्यातील पाणीपुरवठ्याबाबत अधिकृत आणि वस्तुनिष्ठ श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी शिवसेना ऊबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिकेच्या 11 सप्टेंबर 2026 रोजीच्या माहितीनुसार, शहराची दैनंदिन पाण्याची गरज 268 एमएलडी असून प्रत्यक्षात सुमारे 210 एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे दररोज सुमारे 58 एमएलडी पाण्याची तूट असल्याचे पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे. भविष्यातील पाणी गरज भागविण्यासाठी शिलार धरणातून पाणी आणण्याचे नियोजन तसेच पाताळगंगा नदीतून अतिरिक्त पाणी आणण्यासाठी जलवाहिनीचा प्रस्ताव असल्याचे सांगितले जाते. मात्र, या प्रकल्पांना मंजुरी, उपलब्ध निधी, कामाची सद्यस्थिती, पूर्णत्वाची संभाव्य तारीख आणि त्यातून उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी याची अधिकृत माहिती नागरिकांसमोर जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पनवेल-सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन गृहप्रकल्प उभे राहत असताना सध्याचीच पाणी तूट कायम आहे. अशा परिस्थितीत नवीन बांधकामांना परवानगी देताना पाणी उपलब्धतेचे निकष कोणते आहेत, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे. पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे होणारा पुरवठा, त्यावरील खर्च, फेऱ्या, देयके आणि निविदा प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच सिडको, पनवेल महापालिका आणि जलसंपदा विभागाची संयुक्त बैठक घेऊन सध्याच्या व भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन स्पष्ट करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Exit mobile version