| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील हलाल टाऊनशिपचा वाद समोर आल्यावर ममदापूरचे माजी सरपंच शाकिब पालटे यांनी समाज माध्यमांवर हिंदू लोकांचा अपशब्दाने उल्लेख केला. त्याबद्दल विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली असून, त्यांच्याकडून नेरळ पोलीस ठाणे येथे तक्रार देऊन संबंधितावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
नेरळ जवळील ममदापूर येथील एका बांधकाम व्यवसायिकाने सुरू केलेल्या ‘सुकून एम्पायर’ या गृहप्रकल्पची जाहिरात केली आहे. त्या जाहिरातीत हा प्रकल्प फक्त मुस्लिम धर्माच्या लोकांसाठी उभारण्यात येत असून, त्यात हलाल जीवन पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित जाहिरात बांधकाम व्यावसायिकाकडून सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य यांनी त्या जाहिरातीची दखल घेऊन राज्याच्या मुख्य सचिवांकडे विचारपूस केली आहे. सुकून एम्पायर या बांधकाम व्यावसायिकाकडून जातीय द्वेष पसरविल्याबदल त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. हा मुद्दा बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व स्थानिक हिंदू धर्मीय बांधवांनी प्रसार माध्यमांतून जनतेसमोर आणल्यानंतर याबाबत 5 सप्टेंबर रोजी ममदापूर येथील शाकीब पालटे यांनी एका प्रसार माध्यमाला मुलाखत दिली. त्यात त्यांनी, तुम्ही काय हिशोबाने डिक्लेअर करता की, हा मिनी पाकिस्तान आहे. मुसलमानांना राहण्याचा अधिकार नाही का? हे (अपशब्द) हेच येथे राहतील का? अस वाक्य बोलून त्यांनी समस्त हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. त्यामुळे शाकीब पालटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे नेरळचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्याकडे केली आहे.
अपशब्द वापरणाऱ्यावर कारवाईची मागणी
