माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नगर विकास विभागाला पत्र
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिकेतील आस्थापना विभागात सुरू असलेल्या अनियमितता, अनागोंधी कारभार, पदोन्नतीमधील घोटाळे तसेच भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नगर विकास विभागाकडे केली आहे.
पनवेल पालिकेतील कथित गैरप्रकारांबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिरीषकर यांनी यापूर्वी सर्व कागदोपत्री पुरावे व संबंधित शासन निर्णयांसह पालिका आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. तसेच वेळोवेळी आयुक्तांकडे लेखी पत्रव्यवहारही करण्यात आला होता. मात्र, पालिका प्रशासनाकडून या तक्रारींची गंभीर दखल घेतली जात नसल्याचे दिसून आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यानंतर ही बाब माजी मंत्री बच्चू कडू यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानुसार पालिकेत पदोन्नती प्रक्रियेत झालेला कथित घोटाळा, नियमबाह्य पद्धतीने क व ड संवर्गातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच कामोठे येथील एल.के. नामक विकासकाने केलेले तीन अतिरिक्त मजल्यांचे अनधिकृत बांधकाम या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी बच्चू कडू यांनी नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. ही माहिती सुनील शिरीषकर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. या प्रकरणामुळे पनवेल पालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






