अलिबागच्या आंब्याला ठाणे, मुंंबईत मागणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील हापूस आंब्याला मुंबई, ठाणे, पुणे जिल्ह्यात प्रचंड मागणी वाढली आहे. महिन्याभरात सहा लाख रुपये किंमतीचा आंबा विक्री झाल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी दिली आहे. आंब्याला दर चांगले मिळाल्याने आंबा उत्पादक शेतकर्‍यांना या कालावधीत सुगीचे दिवस आले असल्याचे बोलले जात आहे.

रायगड जिल्ह्यात 14 हजार हेक्टर आंब्याचे क्षेत्र असून वीस हजाराहून अधिक आंबा उत्पादक शेतकरी आहेत. जिल्ह्यात भात शेतीबरोबरच आंबा लागवडीवर ही गेल्या दहा वर्षांपाासून भर दिला जात आहे. भातशेतीला पुरक व्यवसाय म्हणून आंबा लागवडीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे आंब्याची लागवडदेखील करण्याकडे शेतकरी अधिक वळू लागला आहे. यंदा अवकाळी पावसाबरोबरच किडरोगामुळे आंब्याच्या उत्पादनात 50 टक्केहून अधिक घट झाली. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. उत्पादनात घट झाली असली, तरीदेखील आंब्याला यंदा मागणी वाढली आहे. त्यात अलिबागच्या आंब्याला प्रचंड मागणी असल्याचे दिसून आले आहे.

अलिबाग तालुक्यात आंब्याचे क्षेत्र 1 हजार 550 हेक्टर असून सात हजारहून अधिक शेतकरी आंबा उत्पादक आहेत. मुंबई, ठाणे, पुणे येथील ग्राहकांनी या वर्षी अलिबागच्या आंब्याला अधिक पसंती दर्शविली आहे. यावर्षी आंब्याला भाव चांगला मिळाला आहे. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासून आंब्याच्या मागणीला सुरुवात झाली. महिनाभरात सुमारे 700हून अधिक आंब्याच्या दोन डझनच्या पेट्या विकल्या असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकरी मनोज पाटील यांनी दिली. यंदा वेगवेगळ्या आकाराच्या आंब्याला सहाशे रुपयांपासून 1 हजार 400 रुपयांचा भाव मिळाला आहे. आंब्याची मागणी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आंबा उत्पादनात यंदा घट आहे. मागणी अधिक पुरवठा कमी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आंब्याचे दर वाढले आहेत. एक डझन आंब्यासाठी ग्राहकांना अडीचशे ते तीनशे रुपये मोजावे लागत आहे. पाऊस पडला नाही, तर जूनच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत अलिबागच्या आंब्याला मागणी राहणार आहे.

प्रदिप बैनाडे,
तालुका कृषी अधिकारी
Exit mobile version