लग्न सराईमुळे बांबूच्या वस्तूनां मागणी

आदिवासी लोकांना मिळाला रोजगार

| नेरळ | प्रतिनिधी |

सध्या लग्न सराई सुरु असून शुभ कार्यासाठी बांबूच्या वस्तू आवश्यक असतात. त्यात टोपल्या, सुपे यांना विशेष मागणी असते आणि या बांबूच्या पातीपासून या वस्तू बनविणारे आदिवासी लोकांना चांगला रोजगार मिळत आहे. नेरळ येथील बाजारात या वस्तू आदिवासी लोक विक्रीसाठी घेऊन येत असतात आणि त्यामुळे लग्न कार्यासाठी खरेदी करणार्‍यांची मोठी गर्दी दिसून येते. पोशीर, कळंब आणि वारे या ग्रामपंचायत मधील आदिवासी वाड्यांमधील लोक वर्षानुवर्षे आणि बारमाही व्यवसाय म्हणून बांबूच्या पातींपासून वस्तू निर्माण करतात.

हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यासाठी आवश्यक असलेल्या बांबूच्या वस्तू यांना सध्या लग्नसराई मध्ये मागणी वाढली आहे. या वस्तू मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून नेरळ ओळखली जाते आणि येथील बाजारात बांबूच्या पातींपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी ठाण्यापासून लोक येत असतात. बांबूच्या पातींपासून बनविल्या जाणार्‍या टोपल्या, लहान टोपल्या तसेच सूप आणि खेळण्यातील वस्तू बनविल्या जातात. त्यात हिंदू धर्मातील कोणत्याही कार्यासाठी बांबूच्या पातींपासून बनवलेल्या टोपल्या आणि सूप हि आवश्यक बाब असते. त्यामुळे या वस्तू बनविणार्‍या आदिवासी लोकांच्या वस्तूंना लग्नसराईच्या काळात मोठी मागणी असते. त्या टोपली आणि सुपांची निर्मिती कर्जत तालुक्यातील आदिवासी लोक करीत असतात. पोशीर ग्रामपंचायत मधील गिर्‍याचीवाडी तसेच उंबरवाडी आणि चिंचवाडी मधील बहुसंख्य आदिवासी ग्रामस्थ हे बांबूच्या वस्तूंची निर्मिती करीत असतात. त्या तिन्ही वाड्यांतील प्रत्येक घरात बांबूच्या वस्तू बनविण्याचे काम वर्षभर सुरु असते. त्यासाठी जंगली भागातील बांबू विकत आणून आपली कारागिरी सुरु करतात.

पोशीर ग्रामपंचायत मधील तीन आदिवासी वाड्यांसह कळंब ग्रामपंचायत मधील भागूचीवाडी आणि वारे ग्रामपंचायत मधील जांभूळवाडी येथील काही आदिवासी कुटुंब देखील या व्यवसायात असून गौरी गणेश उत्सव काळात त्या वस्तूंना अधिक मागणी असते. सणांच्या माध्यमातून आदिवासी लोकांना टोपली आणि सुपे यांच्या विक्रीतून आर्थिक स्थिरता मिळत असते. त्यामुळे बाजारात देखील या वस्तू काही ठराविक ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती असल्याने गिर्हाईक देखील त्या ठिकाणी वस्तूंची खरेदी करण्यासाठी येत असतात. तर आदिवासी भागातील लोक दरवर्षी आणि गेली अनेक वर्षे नेरळ येथे स्टेशन समोर व्यवसाय करतो. पूर्वी त्या ठिकाणी सकाळी सात वाजता जरी बांबूच्या वस्तू घेऊन आलो तर दोन तासात त्यांची विक्री होत असते अशी माहिती कारागीर नामी नागो पारधी यांनी दिली आहे.

Exit mobile version