समाजाच्या योग्य पाठबळाची आवश्यकता
| उरण | प्रतिनिधी |
गेली 40 वर्षाहून जास्त काळ उरण शहरातील कोटनाका येथील बुरुड आळी येथे रस्त्यांवर दिसणाऱ्या टोपल्या, सूप, दुरड्या आणि नैवेद्याच्या द्रोणाच्या दुकानांना आज शांततेने पडदा पडू लागला आहे. धार्मिक आणि दैनंदिन जीवनात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या या बांबूच्या वस्तू आता आधुनिकतेच्या वेगाने झपाटलेल्या काळात मागे पडताना दिसत आहेत.
रामायण, महाभारत जेव्हा घडले तेव्हाही बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू बनविल्या जात होत्या. त्याचा वापर मोठया प्रमाणात होता. स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्रोत्तर काळात धान्य पाखडण्यासाठी लागणारे सूप हे केवळ घरगुती वस्तू नव्हते तर संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होता. प्रत्येक सण, पूजा, लग्नकार्य किंवा पारंपरिक विधीमध्ये सुपाचा उपयोग आवर्जून केला जातो. मात्र, आज प्लास्टिकच्या वस्तूंनी या पारंपरिक सूपाला मागे टाकले आहे. त्यामुळे बुरूड समाजातील कारागिरांचा हाताचा व्यवसाय अक्षरशः नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
पूर्वी उरण शहर व ग्रामीण भागात बुरूड समाजाची अनेक दुकाने होती. हे कारागीर बांबूचे पातळ पट्टे काढून कुशलतेने सूप, दुरड्या, टोपल्या, द्रोण तयार करत. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागातून बांबू उरणमध्ये आणला जातो. एका बांबूची किंमत 150 ते 200 रुपयांपर्यंत असते. त्यानंतर त्याचे तासून, भिजवून, कोरून तयार होणारी ही वस्तू केवळ परिश्रमाचे नव्हे तर कलात्मकतेचेही उदाहरण आहे. ही किंमत ऐकायला लहान वाटते, पण त्यामागचा श्रम मोठा आहे. बांबूपासून वस्तू तयार करण्याचे रण्याचे कौशल्य आज हातच्या बोटावर मोजता येईल इतक्या लोकांकडे उरले आहे. त्यासाठी धैर्य, संयम आणि बारकाई लागते. प्रत्येक वस्तू हाताने विणावी लागते. आधुनिक प्लास्टिक युगात हे कौशल्य टिकवणे अवघड झाले आहे. सध्या तरुण पिढी शिक्षण आणि नोकरीच्या शोधात शहरांकडे वळल्याने हा पारंपरिक वारसा हरवण्याच्या मार्गावर आहे.
पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पुन्हा महत्त्व मिळू शकते. जर शासनाने आणि समाजाने योग्य पाठबळ दिले; तर पर्यटन विकासासोबत या हातकलेचा ‘लोकल ब्रँड’ तयार झाला, तर उरणसारख्या भागात हा व्यवसाय पुन्हा फुलू शकतो. केवळ व्यवसाय नव्हे, तर परंपरेचं पुनरुज्जीवन म्हणून याकडे पाहायला हवं. त्यासाठी बांबूच्या जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करुन त्याचा वापर विविध वस्तू बनविण्यासाठी केला पाहिजे.
बांबूचे सूप, टोपली, दुरडी या केवळ वस्तू नाहीत, तर आपल्या संस्कृतीचा श्वास आहेत. त्यातून ग्रामीण जीवनशैलीचा सुगंध येतो. आजच्या एआयच्या युगात, यांत्रिक जीवनात या हस्तकलेचा पुनर्जन्म व्हावा, यासाठी समाज, प्रशासन आणि पर्यटक सर्वांनी मिळून पाऊल उचलणे गरजेचे आहे. अन्यथा बांबूच्या सूपाची मंदावलेली झणझण ही फक्त आठवणींच्या कुशीत राहील. शासनाकडून ‘बुरूड विकास योजने’अंतर्गत नवे प्रशिक्षण, बाजारपेठ आणि विक्री केंद्र उभारली गेली, तर अनेक कुटुंबांना पुन्हा नवसंजीवनी मिळू शकते. हा केवळ व्यवसाय नाही ही एक परंपरा आहे, जी टिकवली गेली तरच कोकणचा संस्कृतीचा वारसा जिवंत राहील. यासाठी शासन स्तरावरून वेगवेगळे प्रयत्न व्हायला पाहिजे. बांबूपासून बुरुड समाजातील कारागीर, कलाकार वेगवेगळ्या सुंदर, सुबक वस्तू बनवितात. बांबूच्या सुपांमधून कोकणच्या संस्कृतीचा गंध दरवळतो. ही फक्त हातकला नाही, तर परंपरेचा सजीव वारसा आहे. आज प्लास्टिकच्या आक्रमणाने या संस्कृतीचा जीव घुटमळतोय. स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन आणि बाजारपेठ दिली, तर परिवर्तन शक्य आहे. पर्यटन व पर्यावरणपूरक उपक्रमांशी बांबू हातकलेचं पुनरुज्जीवन होऊ शकतं.
बुरूड समाजाचा हातगुण टिकवला, तरच संस्कृती टिकेल. बांबूचे सूप फक्त आठवणींचा प्रतीक उरेल, जिवंत वारसा नव्हे. स्पर्धेत टिकण्यासाठी शासनाने बुरुड समाजाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे.
– अनिल खैरे, बुरुड आळी, उरण







