। सुधागड । वार्ताहर ।
पाली नगरपंचायत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद व नादुरुस्त असल्याने केवळ सीसीटीव्ही कॅमेरे शोभेची वस्तू असल्यासारखे झाले आहे. याचा नागरिकांना व पोलीस प्रशासनास असून अडचण नसून खोळंबा झाला असल्याने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्ती करण्यात यावी अथवा त्याजागी नवीन चांगल्या दर्जाचे कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कपील पाटील यांनी पाली नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदनाद्वारे करणार आहेत. कपील पाटील यांनी माहित देताना सांगितले की, परिसरातील 90 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे हे नादुरुस्त अवस्थेत असल्याने नागरिकांसह पोलीस प्रशासनाला गुन्ह्यांची उकल करण्यास अडचणीचे ठरत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने भुरट्या चोर्या, साखळी चोर यांचे फावते आहे. सार्वजनिक ठिकाणे, संवेदनशील अडगळीच्या जागा, हटाळेश्वर चौक आदी चौकातील सीसीटीव्ही कॅमेर्यांची दुरुस्ती करण्यात यावी. अशी मागणी जोर धरत आहे.