। सावंतवाडी । वृत्तसंस्था ।
माडखोल येथे घडलेल्या आत्महत्या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. त्यामुळे हा तपास दुसर्या अधिकार्यांकडे द्यावा, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी करत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. चुकीच्या पद्धतीने तपास करणार्या पोलीस अधिकार्याचा निषेध माडखोलवासीयांनी केला.
यावेळी पोलीस निरीक्षकांनी आंदोलकांना सामोरे जात त्यांच्या भावना समजून घेत कार्यवाहीची ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, बावळाट सरपंच सोनाली परब, माडखोल ग्रामस्थ राजकुमार राऊळ, संजय लाड, संतोष राऊळ, संतोष राणे, विशाल राऊळ, संदीप सुकी, मनोज घाटकर, संकेत राऊळ, उल्हास राणे, सत्यवान बंड, प्रमोद बंड, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा अॅड. सायली दुभाषी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या अर्चना घारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कानावर हा प्रकार घातला. महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढत असताना हे प्रकरण जबाबदारीने हाताळावे, अशी मागणी केली. माडखोल येथील आत्महत्या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने तपास करणार्या पोलीस अधिकार्याचा निषेध माडखोलवासीयांनी केला. पोलीस ठाण्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करत संबंधित अधिकारी बदलण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थांची मागणी वरिष्ठांकडे पोहोचविण्याचे काम करून त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करू. तपासात सहकार्य करावे. कुठलाही त्रास पोलिसांकडून कधी झालेला नाही आणि होणारही नाही. तपास पूर्ण झाल्याशिवाय कुणावरही कारवाई होणार नाही, असे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.
अर्चना घारे-परब म्हणाल्या, आत्महत्यांविषयीचे तपासकार्य चुकीच्या पद्धतीने सुरू होते. पोलीस अधिकार्यांचे गैरवर्तन त्यात आढळून आले. त्याबाबत जाब विचारण्यासाठी आज पोलीस ठाण्यात धडक दिली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कानावर ही बाब घातली असून, त्यांनी पोलीस निरीक्षकांशी फोनवरून संवाद साधला व सूचना केल्या आहेत. संबंधित तपासी अधिकार्यांना बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.