अनधिकृत कत्तलखाने बंद करण्याची मागणी
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याचे काटेकोर पालन करावे, बेकायदेशीर गोवंश हत्या, अनधिकृत कत्तलखाने बंद करावेत, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा उमेश गायकवाड यांनी दिला.
महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे 18 जून रोजी गोवंश हत्या झाली होती. दरम्यान, आरोपींनी गोरक्षकांना मारहाण करीत पोलीसांना धक्काबुक्की केली होती. या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे महाड शहरात शनिवारी (दि. 22) मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने हिंदू समाजातील नागरिक सहभागी झाले होते. शहरातील ऐतिहासिक चवदार तळे येथे सकाळी 11 वाजता हजारो हिंदू बांधव मोर्चासाठी जमले होते. तेथून मोर्चा मुख्य बाजारपेठमार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर आला असता काही निवडक प्रतिनिधींनी प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.