रंगीबेरंगी माठांना मागणी

गुजरात, मध्यप्रदेशातील व्यावसायिक विक्रीसाठी दाखल

। उरण । वार्ताहर ।

उन्हाच्या झळा वाढू लागल्याने माठांना मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातील ठराविक गावांमध्ये माठ बनवत असले तरी बाजारात ऐनवेळी उपलब्ध होणार्‍या गुजरात, मध्यप्रदेश या भागातील लाल, काळ्या रंगाचे माठ, नळ लावलेले माठ बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. याशिवाय नक्षीदार, रंगीबेरंगी माठही शहरात विक्रीकरिता दाखल झाले आहेत.

सध्या उन्हाची दाहकता वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून माठाच्या आकारानुसार 100 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत माठ विक्रीस आहेत. लाल माती व काळ्या मातीपासून बनवण्यात आलेले माठ थंड पाण्यासाठी स्वस्त पर्याय मानले जातात. उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी गार पाण्याची आवश्यकता असते. यातच नैसर्गिक गारवा आणि मातीचा गोडवा देणारा असेल तर त्याला अधिकच महत्व आहे. म्हणूनच गरिबाचा फ्रिज म्हणून मातीच्या माठांचे महत्व आजही टिकून आहे.

माठातील पाण्याची चवच न्यारी
उन्हाची तीव्रता वाढताच माठातील पाण्याची उन्हाळ्यात आवश्यकता असते. फ्रीजमधील पाणी घेतल्यानंतर पुन्हा पुन्हा पाणी प्यावे, असे वाटते. परंतु, माठातील पाणी एकदा पिल्यानंतर सर्वोत्तम मानले जाते व तहान भागते. मातीत विविध गुणधर्म असतात म्हणून माठातील पाण्याची चव न्यारीच असते.
Exit mobile version