तक्रार, अभिप्राय पेटीची मागणी

| उरण | प्रतिनिधी |

उरण नगरपालिका हद्दीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांचे वेळेत व पारदर्शक निवारण व्हावे, यासाठी नगरपालिका कार्यालयात तक्रार पेटी व अभिप्राय पेटी बसविण्यात यावी, अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागरिक अनेकवेळा संबंधित विभागाकडे तक्रारी सादर करतात; मात्र त्या तक्रारींचे वेळेत निवारण होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. परिणामी प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होत आहे. नागरिकांच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात तसेच समस्यांचे पारदर्शक व वेळेत निवारण व्हावे यासाठी नगरपालिका कार्यालयात तक्रार पेटी व अभिप्राय पेटी बसविणे आवश्यक असल्याचे संघाने नमूद केले आहे. तसेच, आपण ‌‘जनता दरबार‌’ आयोजित करण्याचे आश्वासन दिले असल्याने त्याच धर्तीवर हा उपक्रम राबविल्यास नागरिक-प्रशासन संवाद अधिक प्रभावी होईल, असा विश्वास उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version