रसायनीत उड्डाणपूल बांधण्याची मागणी

। रसायनी । वार्ताहर ।
पनवेल-रोहा रेल्वे मार्गावरील रसायनी स्थानकाजवळ असलेल्या भुयारी रस्त्याचे काम रखडले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर ओढ्याचे पाणी भुयारी रस्त्यावर साचत आहे. परिणामी, मार्गाला तळ्याचे स्वरूप आले असून काम बंद पडले आहे. हा भुयारी मार्ग असुरक्षित असल्याने नागरिकांनी उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली आहे.

रसायनी परिसरातील कष्टकरीनगर, जुनी पोसरी, पोसरी आदिवासीवाडी गावांतील ग्रामस्थांना पनवेल-रोहा रेल्वे मार्ग ओलांडून गावात जावे लागते. सुरक्षिततेचा उपाय आणि होणारी गैरसोय लक्षात घेऊन तसेच रेल्वेच्या अजून फेर्‍या वाढणार असल्याने प्रशासनाने रसायनी स्थानकाजवळ भुयारी रस्त्याचे बांधकाम केले आहे.

धोकादायक वळणांमुळे तो असुरक्षित असल्याने ग्रामस्थांनी त्याला विरोध केला. यापुढे सुद्धा ओढ्याचे पाणी रस्त्यावर साचेल,अशी शक्यता असल्याने या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंत, येथून जाणार्‍या ओढ्याच्या पाण्याचा निचरा सुरळीत करणे आदी कामे बाकी असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Exit mobile version