वनसंपत्तीचे संरक्षणाकरिता अग्निशमन दलाची स्थापनेची मागणी

। उरण । वार्ताहर ।
वणव्यामुळे विविध वृक्षसंपदा, रानभाज्या, नव्याने उगवलेले जंगली रोपे, विविध औषधी वनस्पती ह्या वणव्यामुळे जळुन राख होतात, शिवाय वन्यजीव, कीटक, पक्ष्यांचे घरटी, अंडी, पिल्ले, तसेच तृणभक्षी वन्यजीव, सरपटणारे जीवांचे नाहक बळी जात असल्याने येथील जैवविविधता हळू हळू संपुष्टात येत असल्यामुळे उरण तालुक्यात अस्तित्वात असलेल्या वनसंपत्तीचे वणव्यापासुन संरक्षणासाठी अग्निशमन दलाची स्थापना करण्याची मागणी किरण मढवी यांनी केली आहे. उरण तालुक्यातील वनांना सातत्याने लागणार्‍या आगी हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. त्यावर ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेचे मढवी यांनी परिक्षेत्र वनअधिकारी शशांक कदम आणि उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची प्रत्यक्ष भेट घेवुन वनव्यापासुन वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी वनविभागासाठी अग्निशमन दलाची स्थापना करण्याची लेखी पत्राद्वारे मागणी केली. वणवा विझविताना वनविभागाच्या अधिकार्‍यांची आणि पर्यावरण प्रेमींची होणारी दमछाक थांबविण्यासाठी आणि आगीला तात्काळ नियंत्रणात आणण्याकरिता वनपरिक्षेत्रात अत्याधुनिक अग्निशमन बंब, उपयुक्त स्मार्ट उपकरणे आणि आग नियंत्रण पथक असलेला सुसज्ज व अद्यावत साधनसामुग्री असणे गरजेचे आहे. उरण तालुका वनविभागासाठी वनपरिक्षेत्राच्या हाकेच्या अंतरावर अग्निशमन दलाची स्थापना करण्याची नाविन्यपूर्ण मागणी मढवी केली आहे.

Exit mobile version