| तळा | वार्ताहर |
तळा नगरपंचायतीमध्ये अग्निशमन वाहनाची आवश्यकता भासू लागली आहे. तालुक्यात विविध ठिकाणी घडणाऱ्या आगीच्या घटना तसेच ठिकठिकाणी लागणारे वनवे यामुळे वनसंपदा नष्ट होत चालली असून तळा नगरपंचायतीच्या ताफ्यात अग्निशमन दलाचे वाहन असेल तर अशा घटना रोखण्यास किंबहुना कमी नुकसान होण्यास मदत होईल. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचे तसेच जंगल भागात वनवे लागण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. काही वेळा आगीचे प्रमाण वाढल्यास आग आटोक्यात आणण्यासाठी रोहा व माणगाव येथून अग्निशमन दलाच्या वाहनाला पाचारण करावे लागते. अशावेळी अंतर लांब असल्याने अग्निशमन दलाचे वाहन येईपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असते. मात्र नगरपंचायतीच्या ताफ्यात अग्निशमन दलाचे वाहन आल्यास दुर्घटनेच्या ठिकाणी तात्काळ पोहचता येणार असून जास्त होणारे नुकसानही रोखता येणार आहे. त्यामुळे तळा नगरपंचायतीच्या ताफ्यात अग्निशमन दलाच्या जवानांसह अग्निशमन वाहन उपलब्ध व्हावे अशी मागणी तळावासीयांकडून केली जात आहे.







