जाखडी नृत्यांद्वारे गावोगावी घुंगरांचा निनाद
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गणेशोत्सवाचा जल्लोष रायगड जिल्ह्यात सुरु झाला आहे. दहा दिवसांपासून 21 दिवसांपर्यंत गणेशमुर्ती अनेक घराघरात विराजमान झाल्या आहेत. या कालावधीत सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच लोक नृत्यालाही महत्व दिले जात आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जाखडी(बाल्या)नाचाची घुंगरे वाजत आहे.
जाखडी नृत्याचा उगम कोकण प्रांतातून झाला आहे. रायगड जिल्ह्यात दक्षिण रायगडपासून उत्तर रायगडमध्ये देखील या नृत्याला महत्व प्राप्त झाले आहे. बाल्या नृत्याकडे पुर्वी मनोरंजन म्हणून पाहिले जात होते. महाभारत, रामायणाच्या कथा कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवत होते. हळूहळू या कलेचा विस्तार वाढू लागला आहे. पुराणापासून ते आताच्या चालू घडामोडींवर गाणी गायले जातात. तळ कोकणातून पोलादपूर, महाड, रोहा या दक्षिण रायगडमध्ये बाल्या नृत्य सुरू झाले. 19 व्या शतकात सुरु झालेली ही कला रायगड जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील वाढू लागली. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवामध्ये या नृत्याला अधिक पसंती दिली जाते. मोबाईलमध्ये रमणारी पिढीदेखील या लोक कलेकडे आकर्षित होत आहेत.
श्रावण महिना उजाडल्यावर गावे, वाड्यांमध्ये बाल्या नाचाचे रंग भरण्यास सुरुवात होते. गोपाळकाळा निमित्ताने या नाचाला सुरूवात केली जाते. रायगड जिल्ह्यातील महाजने, सुडकोली, भागवाडी, गंगेचीवाडी, दिवीवाडी, आग्राव, बापळे, आदी ठिकाणी अनेक वर्ष या नाचाची परंपरा सुरू आहे. महाजने गावात श्रमिक नाच मंडळाने 50 वर्षाची परंपरा जपली आहे. रोहा तालुक्यातील देवकान्हे, यशवंतखार, धोंडखार, पाले अशा अनेक गावात ही परंपरा आजही सुरु आहे.
जिल्ह्यात सध्या गणेशोत्सवाचा हंगाम सुरु झाला आहे. या हंगामात मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणून जाखडी नृत्याला मागणी वाढली आहे. वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने जाखडी नृत्यांचे आयोजन केले जात आहेत. त्यामुळे या नृत्याला गणेशोत्सामध्ये सुगीचे दिवस आले आहेत. प्रचंड मागणी वाढल्याने नाच मंडळाचा घुंगरू गावागावात निनादू लागत आहे.
गण, गौळण, भक्तीपर, सामाजिक तसेच सद्य परिस्थितीवर अधारित माहितीपर गाणी गायले जाते. हुंडाबळी, स्त्री- भ्रूण हत्या, दारु व्यसन अशा अनेक विषयांवर गाणी गाऊन समाज प्रबोधनाचे काम बाल्या नृत्याच्या माध्यमातून केले जात आहे. या कलेला आधुनिकतेची जोड देत बदलत्या काळानुसार या कलेमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात जाखडी नृत्य व परंपरेला मोलाचे स्थानआहे. गणेशोत्सवामध्ये ग्रामीण व शहरी भागात बाल्या नृत्याचे सादरीकरण केले जाते. पारंपारिक लोककलेचा आनंद गणेशोत्सवात घेण्याची संधी मिळत आहे.
