अपघाताची भीती कायम; गतिरोधक बसविण्याची मागणी
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
पेण-खोपोली राज्य मार्गावरील इसांबा फाटा हा दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून, येथे अपघाताची भीती कायम आहे. त्यामुळे येथे तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याची मागणी कामगार वर्ग, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या असल्याने सकाळी आणि संध्याकाळी हजारो कामगार दुचाकी, चारचाकी तसेच कंपनीच्या बसमधून ये-जा करतात. त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्याही लक्षणीय असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
इसांबा फाटा हा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून बाहेर पडणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा जोडरस्ता आहे. त्यामुळे कंटेनर, ट्रक, बस, टँकर आणि इतर अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. अनेक वाहने भरधाव वेगाने येत असल्यामुळे फाट्यावरून रस्ता ओलांडणे किंवा वळण घेणे धोकादायक ठरत आहे. विशेषतः सकाळी कामावर जाण्याच्या आणि सायंकाळी सुट्टीच्या वेळेत वाहतुकीचा ताण वाढतो. अशा परिस्थितीत क्षणभराचा निष्काळजीपणा मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
इसांबाफाटा येथे अद्याप प्रभावी वेगमर्यादा नियंत्रणाची व्यवस्था नसल्याने वाहनचालकांचा वेग कमी होत नाही. त्यामुळे अनेकवेळा किरकोळ अपघात, अचानक ब्रेक लावण्याच्या घटना आणि वाहनांची धडक टळल्याची उदाहरणे घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन येथे मानकांनुसार गतिरोधक, इशारा फलक, रिफ्लेक्टर आणि झेब्रा क्रॉसिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
दररोज या मार्गावरून प्रवास करताना भीती वाटते. मोठी वाहने अतिवेगाने येतात. फाट्यावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी तातडीने गतिरोधक बसविणे आवश्यक आहे.
– दिपाली दळवी, प्रवासी
या परिसरात अनेक उद्योग असल्यामुळे हजारो कर्मचारी दररोज या मार्गाचा वापर करतात. एक्सप्रेस वेवरून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका कायम आहे. प्रशासनाने विलंब न करता इसांबे फाट्यावर गतिरोधक बसवून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.
– नवज्योत पिंगळे, कर्मचारी, टाटा स्टील
