। सुधागड-पाली । वार्ताहर ।
पाली-खोपोली राज्यमहामार्ग रुंदीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येथून भरधाव वेगाने वाहने जातात. परिणामी अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे रहदारीचे क्षेत्र असलेल्या जांभुळपाडा येथे पादचारी व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या राज्यमहामार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी रविवारी (दि.9) सुधागड मनसेने एमएसआरडीसीकडे केली आहे. येत्या पंधरा दिवसात जर येथे गतिरोधक बसविला गेला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांनी दिला.
जांभुळपाडा येथून पाली-खोपोली महामार्गावरील रस्ता चांगल्या स्थितीत आहे. जांभुळपाडा फाट्याजवळ आत्मोन्नती विद्यामंदिर शाळा आहे. तसेच जांभुळपाडा पुलाला उतार असल्याने वाहनेही भरधाव वेगाने येत असतात. शाळा, महाविद्यालये सुरू झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जा-ये करताना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. तसेच, जांभुळपाडा येथून पालीच्या दिशेने किंवा खोपोलीच्या दिशेने जाताना वाहन चालकांना खुप कसरत करावी लागत आहे. परिणामी पाली व खोपोली या दोन्ही दिशेला गतिरोधक आवश्यक झाले आहे. गतिरोधक नसल्याने जांभुळपाडा व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्याअगोदर एमएसआरडीसीने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांनी सांगितले.