| माथेरान | प्रतिनिधी |
राज्यातील विविध नगरपालिका क्षेत्रात ज्यावेळी विविध विषयांवर महत्वपूर्ण निर्णय अथवा विकासकामे होण्यासाठी सभा आयोजित करण्यात येते. याबाबत इत्यंभूत माहिती गावातील जनतेला माहीत होण्यासाठी या सभा थेट प्रक्षेपणद्वारे सर्वसामान्यांना दाखविण्यात येते. त्याच धर्तीवर माथेरानमध्ये सुद्धा नगरपरिषदेच्या सभागृहात होणाऱ्या सभांचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात यावे, अशी मागणी येथील उद्योजक भास्कर शिंदे यांनी केली आहे.
अनेकदा काही महत्वपूर्ण कामे परस्पर एखाद्या मर्जीतील ठेकेदाराला सुपूर्द केली जातात आणि त्यामागे खुप काही गौडबंगाल दडलेले असते. त्यामुळे होणारी विकासकामे नियोजनशून्य होऊन निधीचा अपव्यय होत असतो. ज्यावेळी सभांचे आयोजन करण्यात येते त्यावेळी चालू सभेत लोकनियुक्त सदस्य अधिकाऱ्यांचे लांगुलचालन तर करीत नाही ना? किंवा एखाद्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली कोणता सदस्य नाही ना? याची शहानिशा होण्यासाठी सभागृहात होणाऱ्या सभांचे थेट प्रक्षेपण केल्यास निवडून दिलेले लोकप्रतिनिधी खरोखरच आत्मीयतेने कामे करतात की नाही, याचे ज्ञान आणि माहिती प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल. त्यासाठी आगामी काळात होणाऱ्या प्रत्येक सभांचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. परंतु, सत्ताधारी गट काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







