थेट सार्वजनीक बससेवेचा अभाव; पर्यटकांसह स्थानिकांना आर्थिक भुर्दंड
। रेवदंडा । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील नागाव बंदर हे कोकणातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, येथे असंख्य हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि पर्यटन संबंधित व्यवसाय कार्यरत आहेत. मात्र, इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी अजूनही थेट सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने, दररोज शेकडो स्थानिक कामगार आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यातील नागांव येथील समुद्रकिनारा देशात प्रसिद्धी मिळवत आहे. परंतु, या ठिकाणी थेट जाणारी सार्वजनिक वाहतूकीची सोय नाही. या ठिकाणी असंख्य हॉटेल्स आणि रिसॉर्ट असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहे. याठिकाणी दुरच्या गावांतील नागरिक कामासाठी येत असतात. त्याचबरोबर देशभरातील पर्यटक देखील मौज मजेसाठी या ठिकाणी येत असतात. मात्र, सर्वसामान्यांना परवडणारी एसटी बस सेवा ही मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंतच असल्याकारणाने पुढचा प्रवास त्यांना पायीच करावा लागतो. सध्या उकाड्याचे दिवस असल्याने त्यांना पायपीट करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नाहिलाजाने त्यांना खासगी रिक्षा करून ठिकाणापर्यंत पोहोचावे लागत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांसह येथे येणारे कामगार व पर्यटकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह व्यावसायीकांकडून अलिबाग ते नागाव बंदर दरम्यान मिनी बस सेवा सुरू करण्याची मागणी एस.टी. महामंडळ व प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
पर्यटकांचा ओघ वाढावा म्हणून आम्ही हॉटेलमध्ये गुंतवणूक केली. परंतु, याठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. एस.टी. सेवा सुरू झाली तर पर्यटकही वाढतील आणि स्थानिक व्यवसायाला चालना मिळेल.
सुजीत शेठ,
रिसॉर्ट मालक
थेट सार्वजनिक बससेवा उपलब्ध नसल्याने रोज रिक्षाने यावे लागते. त्यातच पगाराचा अर्धा भाग जात आहे. त्यामुळे महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही.
प्रमोद म्हात्रे,
कामगार