माथेरानमध्ये नवीन रुग्णवाहिकेची मागणी

| नेरळ | वार्ताहर |

माथेरानमध्ये वाहनांना बंदी असलेल्या शहरात केवळ रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणेची वाहने यांना परवानगी आहे. त्यात माथेरानची लोकसंख्या आणि पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन नगरपरिषदेला दोन रुग्णवाहिका ठेवण्याची परवानगी आहे. मात्र त्यातील एक रुग्णवाहिका नादुरुस्त होऊन अनेक वर्षे उभी आहे. सध्या एकमेव रुग्णवाहिका उपलब्ध असून शासनाने वाढते पर्यटन लक्षात घेऊन दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

माथेरान नगरपालिकेची रुग्णवाहिका जुनी झाल्याने रुग्णांना सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे. येथे दोन रुग्णवाहिका असून एक 108 ही सरकारी असून दुसरी नगरपालिकेच्या माध्यमातून चालवली जाते. परंतू त्यातील 108 क्रमांक असलेली आरोग्य विभागाची रुग्णवाहिका हि कायम स्वरूपी माथेरानमध्ये उपस्थित नसते. त्यामुळे जनतेला केवळ एका रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागते. माथेरानसाठी माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठान कडून रुग्णवाहिका देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी पालिकेने जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी आणून जोशी युवा प्रतिष्ठानला द्यावी, अशी मागणी दिगंबर चंदने यांनी पालिकेकडे केली आहे.

Exit mobile version