धाकटे वेणगाव येथील जुन्या रस्त्याची मागणी

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषदेच्या हद्दीतील शिवाजीनगर (दहिवली) परिसरातून जाणार्‍या जुन्या वेणगाव रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली असून रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. ठिकाणाहून दुचाकीधारकांना वाहन चालवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. लुंबिनी बाग इमारतीपासून सुरू होणारा हा कच्चा रस्ता इटर्निया कॉम्प्लेक्सपर्यंत अतिशय वाईट अवस्थेत आहे.
कर्जत शहराला लागून असलेल्या वेणगाव कडे जाण्यासाठी कर्जत- दहिवली-जांभिवली या रस्त्याबरोबर दहिवली गावातील शिवाजीनगर भागातून जुना रस्ता आहे.
सदर रस्त्याच्या दुतर्फा गवत आणि झुडुपे वाढलेले असल्यामुळे,रात्री-अपरात्री या रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांना विषारी साप, तसेच भटक्या कुत्र धोका निर्माण झालेला आहे. शिवाय, इटर्निया कॉम्प्लेक्स या इमारतीव्यतिरिक्त या ठिकाणी इतरही निवासी संकुलांचे बांधकाम सुरू असल्याने या रस्त्यावरून बांधकाम साहित्याचे ट्रक येत असतात.परिणामी,आधीच दुरवस्था झालेल्या रस्त्याची आणखीनच दुर्दशा झालेली पहावयास मिळत आहे.
कर्जत नगरपरिषदेच्या हद्दीतील जुना वेणगाव रस्ता, गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्षित झालेला आहे. तरी, भविष्यात एखादी जीवघेणी दुर्घटना आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी, सदर जुना वेणगाव रस्ता त्वरित सुस्थितीत व सुरक्षित उपाययोजनांसह,दर्जेदार बांधकाम साहित्य वापरून डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण करुन दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे कर्जत येथील कार्यकर्ते संजय दळवी यांनी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

Exit mobile version