पांडवकडा खुला करण्याची मागणी

। पनवेल। वार्ताहर ।
पावसाळा सुरू होताच पर्यटक खारघरमधील पांडवकडा धबधब्याकडे धाव घेतात. मात्र गेल्या काही वर्षांत पांडवकडा धबधब्यात पर्यटकांचा मृत्यू झाल्यामुळे या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे अनेकांचा हिरमोड होत आहे. सुरक्षा रक्षक तैनात करून धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा, असे निवेदन खारघरमधील नगरसेवकांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले.

सह्याद्रीच्या डोंगर कुशीत असलेल्या खारघर पांडवकडा धबधबा हजारो पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. पावसाळा सुरू होताच पर्यटकांचा ओघ या पांडवकड्याकडे सुरू होतो. मात्र गेली काही वर्षे पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात येतो. या धबधब्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी सदर ठिकाणी योग्य प्रकारे सुरक्षा रक्षक तैनात करून पावसाळ्याच्या चार महिन्यांपुरता धबधबा परिसर पर्यटनासाठी खुला करावा, अशा मागणीचे सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलाश शिंदे यांना निवेदन दिले. हे क्षेत्र वनखात्याच्या अखत्यारित येत असल्यामुळे संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कीर्ती नवघरे, गीता चौधरी, संध्या शारबिद्रे, बिना गोगरी, नगरसेवक अभिमन्यू पाटील, गुरुनाथ गायकर, अभिमन्यू पाटील, वासुदेव पाटील, वैशाली प्रजापती, गुरुनाथ म्हात्रे, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version