| नेरळ| प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सर्व माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये गणवेशधारी पोलीस तैनात असावेत अशी मागणी वृंदाली फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. कर्जत पोलीस उप अधीक्षक धुळदेव टेले यांना वृंदाली फाऊंडेशनच्या अध्यक्षा भारती कांबळे यांच्याकडून निवेदन देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्र राज्य आणि देशात सुरू असलेल्या महिलांवरील आणि चिमुरड्या मुलींवरील शारीरिक आणि मानसिक अत्याचार, शोषणाच्या ज्या घटना घडत आहेत. कल्याण, उरण, कोलकता आणि बदलापूर येथील महिला आणि लहान मुलींवरील अत्याचाराचे विषय समोर आले आहेत. पोलीसदलाकडून तक्रार दाखल करण्यास जो वेळ घेतला जात आहे. या सर्व गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. कोणतीही सामान्य घरातील व्यक्तीकडे या विषयावर तक्रार घेऊन येते तेव्हा ती पीडित व्यक्ती पोलीस ठण्यात न्यायाच्या अपेक्षेने धाव घेत असतात.
तरी संपूर्ण रायगड जिल्ह्यात अशा घटना घडू नये यांसाठी पोलीस दलाची दामिनी पथक शासनाकडून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने ज्या प्रक्रिया गरजेच्या आहेत त्या तत्परतेने सुरू कराव्यात अशी मागणी केली आहे. कर्जत शहरातील सर्व शाळांमधील सीसीटिव्ही यंत्रणा या सक्षम असाव्यात आणि शाळेभोवती पोलीस तैनात असावेत अशी मागणी वृंदाली फाऊंडेशनकडून करण्यात आली. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक यांच्यासोबत भारती कांबळे तसेच संस्थेच्या उपाध्यक्ष वर्षा डेरवणकर, वैशाली धनवे यांनी चर्चा केली.