म्हशींच्या शिंगांना रेडिअम पट्टी लावण्याची मागणी

। कर्जत । वार्ताहर ।
रात्रीच्या वेळी अचानक म्हैस समोर आल्याने अनेकांचे अपघात झालेले आपण नेहमीच पाहतो. संध्याकाळी प्रत्येक गावातील म्हशी चारून घरी परत आणतात तेव्हा त्यांचे गुराखी रस्त्याच्या मधूनच म्हशी घेऊन जातात. या जनावरांना समोरून येणार्‍या गाडीबाबत काही कळत नाही. हॉर्न वाजवला किंवा गाडी जवळ आली, अगदी धडकली तरी त्या बाजूला होत नाहीत. त्यांच्या बरोबर असणारा गुराखी देखील त्यांना बाजूला करण्याची तसदी घेत नाहीत. त्यामुळे अपघात होतात आणि अनेक मोटरसायकल चालवणार्‍यांना प्राणाला मुकावे लागले. त्यामुळे म्हशींच्या शिंगांना रेडियम पट्टी लावण्याची सक्ती करावी. अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
काळा रंग असल्याने रस्त्यावर अचानक आलेली म्हैस वाहनचालकांना दिसत नाही. यामुळे बरीच वाहने, विशेषतः मोटारसायकलचा अपघात होऊन अनेक तरुणांचे जीव गेले आहेत. कशेळे येथील व्यापारी शंकर ठोंबरे हे कर्जतला जात असताना अचानक म्हैस आडवी आली. त्यामुळे त्यांची धडक बसून ते जबर जखमी झाले. अंधार पडल्यावर रस्त्यावर एखादे काळ्या रंगाचे जनावर अचानक आले तर मोटरसायकल वरील ताबा सुटून त्या जनावराला धडक बसते व अपघात होतो. या अपघातात एखादा अवयव निकामी होतो तर कधी जीवास मुकावे लागते. त्यामुळे मोटरसायकल चालकांनी गाडी चालवताना मर्यादित वेगात चालवावी आणि म्हशींच्या किंवा जनावरांच्या मालकांनी आपली जनावरांच्या शिंगांना रेडियमची पट्टी लावावी म्हणजे अपघात टळू शकतात.

Exit mobile version