उरण-पनवेल रस्त्यावरील बॅरिकेट्स काढण्याची मागणी

| उरण । वार्ताहर ।
उरण तालुका औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा तालुका समाजला जातो. अनेक विविध प्रकारचे विकासकामे येथे जोरात चालू आहेत. विकासाची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, हे विकास नागरिकांच्या विकासाला अडथळा आणत असल्याचे चित्र दिसत आहे. उरण-पनवेल मुख्य रस्त्यावर फुंडे हायस्कूल, बोकडविरा, कोटगाव येथे बॅरिकेट्स चॅनेल (लोखंडी कमान) लावून अवजड वाहनांना बंदी आणली गेली आहे. कोणत्याही अवजड वाहनांना आता या रस्त्यावरून प्रवास करता येणार नाही.

सार्वजनिक विभागाने सदर ठिकाणी लोखंडी कमान लावण्याचा निर्णयावर बोकडविरा, कोटगाव, फुंडे, डोंगरी, पाणजे गावातील नागरिक नाराज असून, सदर बॅरिकेट्स चॅनेल काढले नाही तर गावच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. बॅरिकेट्स चॅनेल लावल्याने जड वाहनासोबतच महामंडळचे बसेस, मोठ्या खासगी बसेस, शासकीय मोठी वाहने, रुग्णवाहिकांसह इतर वाहनांना येथून प्रवास करता येत नाही. महत्त्वाची वाहने सदर गावात पोहोचू शकत नाहीत. बोकडविरा, डोंगरी, फुंडे, पाणजे, कोटगाव या गावांना गावात घरे, बिल्डिंग बांधण्यासाठी खडे, माती, रेती, वीट, लोखंडी तारा, शिगा लागतात. हे साहित्य जड वाहनातूनच सदर गावात न्यावे लागते. आता मात्र गावच्या वेशीवर, प्रवेशद्वाराजवळच प्रशासनाने बॅरिकेट्स चॅनेल बसविल्याने जड वाहनांना, मटेरियल नेणार्‍या वाहनांना गावात जाता येत नाही.

सदर बॅरिकेट्स चॅनेल 15 दिवसाच्या आत हटवावीत अन्यथा कोटगाव ग्रामसुधारणा मंडळ व स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरण कोट या संघटनेतर्फे तसेच बोकडवीरा, कोटनाका, फुंडे, डोंगरी, पाणजे गावातील ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

Exit mobile version