अनाधिकृत होर्डिंग हटविण्याची मागणी

| उरण । वार्ताहर ।

उरण, जेएनपीए बंदर तसेच द्रोणागिरी नोड परिसरात अनाधिकृत होर्डिंग आहेत. उन्ह पाऊस झेलत उभ्या असलेल्या अनाधिकृत होर्डिंगच स्ट्रक्चरल ऑडिट संबंधित प्रशासनाचे अधिकारी करत नसल्याने नवीमुंबई परिसरात अनाधिकृत होर्डिंग पडण्याची दुदैवी घटना या अगोदर घडली होती. त्या दुदैवी घटनेत जीवितहानी झाली नाही. नुकताच पुणे शहर परिसरात वादळीवार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसात रस्त्याच्या कडेला असणारे अनाधिकृत होर्डिंग पडण्याची दुदैवी घटना घडली. या दुर्घटनेत पाच निष्पाप नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पुणे प्रशासनाने सदरचे अनाधिकृत होर्डिंग हटविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे.

असे असतानाही उरण, जेएनपीए, द्रोणागिरी नोड परिसरातील नागरिकांच्या, पादचार्‍यांच्या जीवाशी खेळत असणारे अनाधिकृत होर्डिंग आजतागायत रस्त्याच्या कडेला जैसे थे स्थितीत उभे आहेत. त्यामुळे येऊ घातलेल्या पावसाळ्यात सदर अनाधिकृत होर्डिंग पडण्याची दुदैवी घटना घडली आणि त्यात निष्पाप नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले तर त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्‍न प्रवाशी नागरीक विचारत आहेत.

Exit mobile version