। उरण । वार्ताहर ।
देशात व राज्यात पुन्हा कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. शासकीय पातळीवर मर्यादित पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उरणमध्येही कोरोना बाधीतांचे आकडे वाढत चालल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्वरित कोरोनाग्रस्तांवर उपचार होण्यासाठी बंद करण्यात आलेले कोव्हिड हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्याची मागणी उरणच्या जनतेकडून केली जात आहे. उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. त्यामध्ये जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, जिटीआय, डीपी वर्ल्ड, सिंगापूर पोर्ट तसेच अनेक छोटे मोठे कंपन्या व गोदामे उभी राहिली आहेत. त्याठिकाणी येणारा कामगार वर्ग हा स्थानिकांसह परगावातील व परदेशातील यांचा समावेश जास्त आहे. तसेच येऊ घातलेल्या कोरोनाच्या तिसर्या लाटेचा परिणाम जाणवू लागल्याने शासनाने कडक निर्बंध घालण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. उरणमध्येही तिसर्या लाटेचा परिणाम जाणवू लावले आहेत.
मागील कोव्हिड काळात कोरोना रुग्णांची हॉस्पिटलमध्ये दाखल करताना कुटूंबाची होणारी हेळसांड व भरमसाठ बिल भरूनही रुग्ण गमविण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. काहींची कुटूंब उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे आता रूग्णांची वाढती संख्या विचारात घेता तसेच आपल्या उरणमध्ये असलेले औद्योगिकीकरण विचारात घेता मुंबईसह इतर मोठमोठ्या विविध शहरातून येणार्या नागरीकांचे प्रमाण पाहता कोवीडची तिसरी लाट अधिक झपाट्याने वाढण्याची शक्यता विचारात घेऊन तातडीने कोविड सेंटर स्टाफच्या उपलब्धतेसह तसेच औषधोपचारासह उरणमध्ये सिडकोने लाखो रुपये खर्च करून उभारलेले कोविड हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्याची मागणी उरणच्या जनतेकडून जोर धरू लागली आहे.
