| आगरदांडा | वार्ताहर |
नांदगाव हायस्कूल असून या शाळेला लागूनच सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेली मोरी आता धोकादायक बनली आहे. समुद्राचे पाणी वाहून जाण्यासाठी गोल पाईपलाईन टाकून ही मोरी बनवण्यात आली आहे. खूप वर्ष जुनी मोरी असल्याने या मोरीच्या भाग खालीवर झाला आहे. त्यामुळे या मोरीवरून गाडी गेल्यावर गाड्या उडतात व त्यातून अपघात होत आहेत. मोरीला असणारे संरक्षक कठडे सध्याच्या घडीला तुटलेले असून त्यामुळे गाडीचा अपघात झाल्यास खोल खड्ड्यात पडून अपघातग्रस्त गंभीर जखमी होत आहेत.
सदरच्या मोरीचे काम पावसाळ्यापूर्वी होणे खूप गरजेचे होते परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने सदर मोरी बकाल अवस्थेत आहे. सदरची मोरी हि अगदी जवळच असणाऱ्या नांदगाव हायस्कूल शेजारी असल्याने येथून या हायस्कूल ची शेकडो मुले नेहमीच ये-जा करीत असतात. संरक्षक कठडे व भिंत नसल्याने शालेय विद्यार्थी याना सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सन 20 19-20 मध्ये सदरील रस्त्यावर मोरी च्या जागी छोटा पूल बांधण्यासाठी एक कोटी 25 लाख रुपये मंजूर झाले होते. सदरचा ठेका सुद्धा ठेकेदाराने घेतला होता. परंतु हे काम घेतलेल्या ठेकेदाराने काम न केल्यामुळे सदरचे काम रखडलेले आहे. या कामाचे लवकरात लवकर पुन्हा टेंडर काढून मंजूर निधी लवकरात लवकर खर्च करण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
पुलाचा टेंडर मंजूर होऊन दोन-तीन वर्ष झाली आहेत तरी पण काम सुरु झालेलं नाही. सदर पुलावरून जाणाऱ्या गाड्यांची रहदारी मोठया प्रमाणात आहे. तसेच शाळेतील विद्यार्थी ये-जा करतात विद्यार्थ्यांकारिता अतिशय धोकादायक राहदरीचा झाला आहे.
सचिन पाटील, नांदगाव ग्रा.पं. सदस्य
पुलाच्या कामास विलंब होत असेल तर तातडीने पुलाच्या बाजूची लोखंडी रेलिंग आणी सौरक्षण भिंत बांधावी जर या कामाकडे दुर्लक्ष्य केल्यास लवकरच आम्हाला जनांदोलन छेडावे लागेल असा इशारा यावेळी सचिन पाटील यांनी दिला आहे.