मैनुशेठ वाडा पुलाच्या कठडा दुरूस्तीची मागणी

। पोयनाड । वार्ताहर ।
अलिबाग-वडखळ मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो. त्यावेळी सदर रस्त्यामध्ये असणार्‍या समस्यांची मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केल्यानंतर ती पूर्ण होत असे. परंतु हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्यानंतर रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कठडा तुटला आहे. गेल्या वर्षभरात त्यांची दुरूस्ती झाली नाही. कठडा दुरूस्तीची मागणी जनतेकडून होत आहे. मैनुशेठवाडा येथील पुलाचा कठडा तोडून चारचाकी वाहन खाली कोसळले, वाहन चालकाला दुखापत झाली. अपघातानंतर वर्षभरात कठडा दुरूस्त होईल अशी आशा होती. तुटलेल्या कठड्या मधून पडून एका दुचाकी चालकाला अपघात झाला, तरीही कठडा दुरूस्त झालेला नाही.

रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनाची वर्दळ असते. शनिवार, रविवार त्यात तर अधिकच भर पडते. अलिबाग, मुरूड, नागाव तालुक्याची आर्थिक कडी पर्यटन व्यवसायाबरोबर घट्ट जोडली गेली आहे. शनिवार, रविवार अलिबाग-वडखळ रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी असते. वाहनांच्या रांगा लागतात, अशावेळी दुचाकी चालकास रस्त्याच्या साईट पट्टीवर उतरण्यास भाग पाडतात. दुचाकी वाहन चालकाचा तोल जातो तो खाली पडतो. दुखापत होते. कठडा तुटलेल्या पुलाजवळ असा प्रसंग घडला तर दुचाकी चालक कठडा तुटलेल्या पुलावरून खाली पडेल. जिवितहानी होईल. त्यामुळे पुलाचा कठडा त्वरीत दुरुस्त करावा अशी जनतेची मागणी आहे.

Exit mobile version