| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुडमध्ये सुरु असलेली आधार सेवा सध्या बंद असल्याने येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन दहा दिवसांत आधार सेवा उपलब्ध न झाल्यास त्या विरोधात तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर आंदोलन करू, असा इशारा पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. हे निवेदन मुरूडचे नायब तहसीलदार संजय तवर यांनी स्विकारले.
उदय सबनिस यांनी 2013 सालापासून मुरूड येथे आधार केंद्राची सुरुवात केली होती. त्यांनी आधार केंद्र व महा ई-सेवा केंद्र सुरू करून स्थानिक नागरीकांना अनेक शासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या. तसेच, विविध शासकीय योजनांची माहिती देऊन नागरीकांना त्याचा लाभ मळिवून दिला. त्यानंतर 2021 मध्ये उदय सबनिस यांना तहसिल कार्यालयातील एक खोली उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, काही दिवसांपासून त्यांच्या आधार केंद्रवरील आधार नोंदणी बंद झाली आहे. त्यामुळे येथील नागरीकांना आधारच्या बारीक-सारीक कामांकरीत रोहा किंवा आलिबाग येथे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यापुर्वी मुरुडमध्ये पोस्ट ऑफिस व बॅंक ऑफ इंडिया या ठिकाणी आधार सेवा उपलब्ध होती. त्यामुळे ती सेवा पुन्हा उपलब्ध करण्यात यावी. तसेच, पात्र लाभार्थ्यांना आधार सेवा सुरु करण्याची संधी देऊन येत्या दहा दिवसांत याठिकाणी आधार सेवा पुर्ववत सुरु करावी. तसे न झाल्यास नाईलाजास्तव याविरोधात तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यावाचून पर्याय राहाणार नाही, असे पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
आधार सेवा पुर्ववत करण्याची मागणी
