दसऱ्यानिमित्त भाताच्या लोंबीना मागणी

स्थानिक महिलांना विक्रीतून रोजगार

| माणगाव | प्रतिनिधी |

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये झेंडूची फुले भाताच्या लोंबी व सोनालूची फुले यांची आवक झाली असून, या सणासाठी निसर्गात उपलब्ध असलेल्या या वस्तूंना मोठी मागणी आहे.

दसरा हा विजय, ऐक्य आणि समृद्धीचा संदेश देणारा सण आहे. या सणाला धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या जितके महत्व आहे, तितकाच निसर्गाशी जोडलेला वारसा जपण्याचा संदेशही त्यातून मिळतो. दसऱ्याच्या निमित्ताने झेंडूची फुले, भाताच्या लोंबी आणि सोनालुची फुले यांचा विशेष सन्मान केला जातो. झेंडूची फुले दसऱ्याच्या सजावटीत अत्यावश्यक मानली जातात. पिवळ्या व केशरी झेंडूच्या माळा, तोरणे आणि रांगोळ्या घराघरांत दिसतात. शुभत्व, ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या फुलांचा वापर देवी-देवतांच्या पूजेत मोठ्या श्रद्धेने केला जातो. भाताच्या लोंबी शेतकऱ्यांच्या मेहनतीचे प्रतिक असलेल्या भाताच्या लोंबीला दसऱ्याला विशेष स्थान आहे. अन्नधान्याची संपन्नता आणि भरभराट दर्शविणाऱ्या या लोंबी ग्रामीण भागात देवांना अर्पण करून समाजामध्ये वाटल्या जातात. त्यामुळे कृषी संस्कृतीचे महत्व अधोरेखित होते. स्थानिक महिला विक्री करतात व यातून रोजगार ही मिळत आहे. या तीन नैसर्गिक प्रतीकांमधून दसरा सण आनंद, समृद्धी आणि समाजातील ऐक्याचा संदेश देतो. धार्मिक परंपरा, कृषी संस्कृती आणि मैत्रीचे बंधांचा संगम असलेला हा उत्सव लोकजीवनात नवचैतन्य निर्माण करणारा आहे.

आजही प्रथा कायम
सोनालुची फुले किंवा आपट्याच्या झाडाची पाने दसऱ्याला 'सोनं' म्हणून एकमेकांना दिली जातात. या फुलांना ऐश्वर्य, मैत्री आणि ऐक्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार सोनालुची फुले देऊन परस्पर संबंध दृढ करण्याची प्रथा आजही कायम आहे. या फुलांची 10 ते 20 रुपयांना जुडी करून विकली जाते.
Exit mobile version