दोन किमीचा खाडीकिनारा; पालिकेकडून सीआरझेडकडे पत्रव्यवहार
| पनवेल | वार्ताहर |
निसर्गाच्या आशीर्वादामुळे खारघरला दोन किमीचा खाडीकिनारा लाभला आहे. पालिकेने हा किनारा विकसित करून सरोवर विहाराची निर्मिती करावी, अशी मागणी खारघरवासीयांकडून केली जात आहे.
खारघरला सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स, शिल्प चौक, उत्सव चौक आणि मेट्रोमुळे आता एक नवी ओळख मिळाली आहे. खारघर सेक्टर 17 मध्ये सिडकोने वास्तुविहार आणि सेलिब्रेशन गृहनिर्माण संकुल उभारले आहे. या गृहनिर्माण संकुलालगत दोन किमीचा खाडीकिनारा आहे. सद्यस्थितीत खाडीकिनाऱ्याचा पालिकेकडून कोणताही उपयोग करण्यात येत नसल्याने तो पडीक आहे. त्यामुळे काही मद्यपी उच्छाद मांडताना दिसून येत आहेत; तर काही रेतीमाफिया परिसरात रेतीउत्खनन करत आहेत. तसेच गेल्या महिनाभरापासून येथे सोनेरी कोल्हा नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे येथील निसर्गाची होणारी हानी रोखून पालिकेने येथे सर्व वयोगटातील नागरिकांसाठी सरोवर विहाराची निर्मिती करावी, अशी मागणी खारघरवासीयांकडून करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने येथील लोकप्रतिनिधींकडूनदेखील सरोवर विहाराची मागणी करण्यात येत आहे. सिडको तसेच पनवेल पालिका प्रशासनाकडून येथे बोटिंग क्लब, वॉकिंगसह सायकलिंग ट्रॅक तसेच मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी उभारल्यास खारघरच्या सौंदर्यात आणखी भर पडेल. तसेच खारघरवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी एक नवीन पर्यटनस्थळ होऊ शकते, असे येथील लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे.
विकासात भर खारघरच्या विकासात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यात खारघरमधील सेक्टर सोळा ते दहा सिडको वसाहतीला नैसर्गिकरीत्या दोन किलोमीटरहून अधिक खाडीकिनारा मिळाला आहे. त्यामुळे येथे मनोरंजनासाठी पर्यटनस्थळ म्हणून उदयास येऊ शकते. खारघर खाडीत बोटिंग सुरू करण्याबाबत मेरीटाईम बोटिंग प्रा. लि.कडून सर्वेक्षण झाल्याचे समजते. तसेच सिडकोने बोटिंगला परवानगी द्यावी, असे पत्र श्रमिक मजूर कामगार सहकारी संस्थेने तीन वर्षांपूर्वी सिडकोला दिले असल्याचे समजते.
संजय कटेकर,
कोस्टल रेग्युलेशन झोन विभागाकडे सदर जागेसंदर्भात पालिकेकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी जेट्टी उभारण्याचा प्रस्ताव आहे. परवानगी मिळाल्यानंतर पुढील उपाययोजना केली जाईल.
शहर अभियंता,
पनवेल महानगरपालिका